मुंबई, 30 मे : तुम्हाला प्रशासनात काम करायचंय? त्यासाठी उत्तम संधी आहे. मुख्यमंत्री फेलोशिप 2019ची घोषणा केली गेलीय. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यात माझ्याबरोबर सहभागी व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनीच केलंय. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं वय 21 ते 26 वर्षाच्या मधे हवं. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले कोणत्याही शाखेचे पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर यात प्रवेश घेऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून.  त्याबद्दलच जाणून घेऊ या.
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ११ महिन्यांच्या कालावधी आहे. उमेदवाराला दर महिन्याला 35 हजार रुपये फेलोशिप मिळेल. नामांकित संस्था, उद्योग वा सार्वजनिक उपक्रम संस्थेतील कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असलेले तरुण या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतील. आयआयटी, आयआयएम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयं, एनआयटी, जेबीआयएमएस, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची अट शिथिल केली जाईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना कार्यक्रमानंतर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी करता येईल किंवा उच्च शिक्षण घेता येईल.
तरुणांमध्ये नेतृत्त्वगुण विकसीत होतील, सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना तसा अनुभव मिळेल असा हा अभ्यासक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारसोबत काम करण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीत अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयामार्फत राबवण्यात येत आहे. या 11 महिन्यात शासनासोबत काम करण्याची संधी देणं, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, समाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रम आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीत आणि धोरण निर्मितीत त्यांना सहभागी करून घेणं, हा उद्देश आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours