मुंबई, 16 जून- मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात नव्या 12 मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन सदस्यांचा समावेश करुन त्यांना शपथ देण्याचा समारंभ आज, 16 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता, राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे करण्याचे नियोजित करण्यात आला आहे. शपथविधीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात शपथ घेणारे मंत्री राजभवनात दाखल होणार आहेत.
जयदत्त क्षीरसागर मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात पोहोचले आहेत. त्यांचे कुटूंब आणि समर्थक मोठ्या संख्येने आले आहेत. रिपाइं नेते अविनाश महातेकर हे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पोहोचले आहेत. महातेकर यांना गेटवर पोलिसांनी अडवल्याची माहिती मिळाली. मंत्रिपदाची शपथ घ्यायला जात आहेत, असे प्रेस फोटोग्राफर यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी महातेकर यांनी आत सोडले. सामाजिक न्याय खात्यात काम करायला आवडेल, असेही महातेकर यांनी सांगितले आहे. यावेळी पत्नी वृषाली महातेकर यावेळी उपस्थित होत्या.
हा आहे नवा फॉर्म्युला..
मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 1021 असा असणार आहे. भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे.
या नेत्यांची मंत्रिपदी लागणार वर्णी..
नव्या मंत्रिमंडळात विदर्भातून अनिल बोंडे(भाजप), परिणय फुके(भाजप), संजय कुटे(भाजप), अशोक उईके(भाजप) यांची, मुंबईतून आशिष शेलार(भाजप), योगेश सागर(भाजप), अविनाश महातेकर(रिपाइं) यांची, पश्चिम महाराष्ट्रातून सुरेश खाडे(भाजप), बाळा भेगडे(भाजप) यांची, मराठवाड्यातून अतुल सावे(भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)यांची, उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) तर दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातून तानाजी सावंत (शिवसेना) यांची वर्णी लागणार आहे.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांसह या मंत्र्यांना डच्चू..
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह राजकुमार बडोले आणि दिलीप कांबळे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, योगेश सागर, अनिल बोंडे, संजय कुटे, बाळा भेगडे, परिणय फुके, अतुल सावे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काही खासदार शनिवारीच (15 जून) रात्री उशिरा अयोध्येत दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयदेखील पहाटेच मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ठाकरे कुटुंबीय अयोध्येत पोहोचतील, अशी माहिती आहे. यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील. लोकसभा निवडणूक 2019मध्ये विजयी झालेल्या सर्व खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours