मुंबई- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार येत्या 15 जूनला अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख 15 जूनला अयोध्येत शिवसेना सर्व विजयी खासदारांसह राम लल्लाचं दर्शन घेणार आहे. पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी शंख फुंकणार असल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड यश मिळविले. 18 जागांवर शिवसेनेचे उमेदवार दणदणीत आणि खणखणीत मताधिक्याने विजयी झाले. या 18 खासदारांसह उद्धव ठाकरे यांनी एकवीरा आईचे अगदी मनोभावे दर्शन घेतले.
लोकसभा निवडणुकीत भगवा फडकवणाऱ्या शिवसेनेच्या 18 खासदारांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब एकविरा देवीचे दर्शन घेतले होते. कार्ला गडावर उद्धव ठाकरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. शिवसेना आणि भाजपा युतीला लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले आहे. राज्यातल्या जनतेने शिवसेनेचे 18 खासदार निवडून दिले. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, खासदार भावना गवळी, धैर्यशील माने, गजानन कीर्तिकर, श्रीरंग बारणे, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अनिल देसाई, राजन विचारे, श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्व विजयी खासदार तसेच शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours