अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज गावचे जवान कपिल नामदेव गुंड ( वय-26) यांना लष्करी सेवेत कर्तव्य बजावत असताना गुरूवारी (दि.15) स्फोटात वीरमरण आलं. शहीद कपिल गुंड यांच्यावर आज अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कपिल गुंड यांना त्यांच्या जन्मगावी अजनुज इथं भीमा नदीकाठी लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. 

वीर जवान कपिल गुंड यांचे पार्थिव आज सकाळी सहा वाजता विमानाने पुण्यामध्ये आणण्यात आलं. या ठिकाणी त्यांना लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव लष्करी वाहनातून अजनुजकडे रवाना करण्यात आलं. 

शहीद कपिल यांचे पार्थिव अजनुज इथे दाखल झाल्या नंतर घरच्या लोकांनी एकच हंबरडा फोडला. त्यांचे वडील स्वतः एक माजी लष्करी जवान आहेत.आई,वडील, पत्नी आणि मुलांसह सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला. शहीद कपिल यांच्या देशासाठीच्या बलिदानाने संपूर्ण अजनुज गावच नव्हे तर नगर जिल्हा गहिवरून गेला आहे. 

अजनुज गाव हे वीर जवानांचे गाव आहे. शहीद कपिल यांच्या सह गावातील तीन जवानांनी आतापर्यंत देशासाठी हौतात्म्य पत्करलं आहे. शहीद जवान कपिल यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून नागरिक उपस्थित आहेत. अजनुजमधील ग्रामस्थ आपल्या लाडक्या वीर जवानाला अश्रूनयनांसह अखेरचा निरोप देतील.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours