सिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गावातील १७ घरांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले ३९ घरांचे अंशत: नुकसान झाले.  सुरुवातीला मदतीचा हात मिळाला पण आता कोणीही या गावाकडे ढुंकून पाहिला तयार नाहीत.


 भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात जंगल व डोंगराळ परिसरात असलेल्या धनेगाव येथे ७ व ८ ऑगस्ट २०२२ ला  ढगफुटी झाल्याने गावाला चारही बाजूने पुराने वेढले लागले गावात सगळीकडे हाहाकार उडाला.घरात पाणी शिरल्याने जिल्हा परिषद सदस्य सौ.सुषमा पारधी यांनी प्रशासनाला मदतीची विनवणी केली.प्रशासनाने दुसऱ्या दिवशी याची दखल घेऊन गावकऱ्यांना मदत करण्यास सुरुवात केली पोलीस प्रशासनाने ताबडतोब कापडी तंबू पाठवले.  घरातील धान्य व सामान वाहून गेल्याने प्रशासनाने धान्य पुरवले. गावातील  १७ घर जमीनदोस्त झाल्याने काहींनी समाज मंदिरात तर काहींनी   शाळेत आश्रय घेतला‌.धनेगावातील   या पुराने  ६० एकरावरील धान  मुळासह उपटून नेले. गावातील रस्ते  उद्ध्वस्त झाले. गावातील तीन पूल खचले. या पुरामुळे पूर्णपणे हतबल झालेल्या धनलाल काळसर्पे या व्यक्तीचे हृदयविकाराने  निधन झाले. पुरामुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन निकामी झाली आहे. नळाला पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना नाईलाजास्तव पुराचे पाणी प्यावे लागत आहे. नळ दुरुस्तीचा  प्रस्ताव शासन दरबारी मंजूरीसाठी पडून आहे.



 धनेगावला भंडाऱ्याचे  आमदार परिणय फुके, आमदार राजू कारेमोरे तसेच काही अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.चांदपूर देवस्थानाने मदत केली. एक महिन्याचे धान्य प्रशासनाने दिले मात्र आज एक महिन्यानंतर काय खावे आणि कसे जगावे हा प्रश्न सर्वांना पडला  आहे. प्रशासनाने लावलेले तंबू हे जंगल परिसरात  आहेत.रात्री वन्य प्राण्याचा धोका असल्याने केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. तंबू असलेल्या परिसरात आंघोळीचा व शौचालयाचा प्रश्न  अनुत्तरीत आहे. आंघोळ  उघड्यावर करावी लागते आणि शौचाला बाहेर जावे लागते.



दिवसभर मजुरीला जाणारे गावकरी आपल्या पडलेल्या घराकडे पाहतात आणि रात्री कापडी तंबूकडे परततात.छोट्याशा तंबूत कसाबसा संसार करणे सुरू आहे. आता राजकारण्यांनी गावाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. प्रशासकीय अधिकारी सुद्धा आता गावात अजिबात येत नाहीत.जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे काम कोणते आहे हे कळायला मार्ग नाही.  धनेगावचे न भरून येण्यासारखे नुकसान झाले आहे.या गावकऱ्यांना मदतीचा हात देवून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम राजकारण्यांनी आणि प्रशासनाने हातात हात घालून करायला पाहिजे होते मात्र जिल्हा प्रशासनाने व राजकारण्यांनी या गावाला वाऱ्यावर सोडले आहे. धनेगावच्या जिल्हा परिषद सदस्य सुषमा पारधी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत धनेगावचा प्रश्न पोटतिडकीने मांडला पण प्रशासन जागेवरुन हलायला तयार नाही.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours