सांगली, 12 ऑगस्ट : केंद्राकडून पूरग्रस्त भागाला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगलीतील अपघातग्रस्त कुटूंबांना 5 हजार रोखीनं अर्थसाहाय्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्य आपत्कालीन कक्षास भेट दिली. उर्वरित रक्कम बॅंक खात्यात जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. तर राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी रशिया दौरा रद्द केला आहे. पियूष गोयल यांच्यासह 5 राज्यांचे मुख्यमंत्री या दौऱ्यावर जाणार होते. पंतप्रधांनी नरेंद्र मोदींनी दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली होती. पण तो दौरा आता फडणवीसांकडून रद्द करण्यात आला आहे.
महापुराच्या आज 8व्या दिवसानंतर सांगली आणि कोल्हापुरातील पूरपरिस्थिती हळूहळू ओसरायला लागली आहे. मात्र, हा महापूर मागे अनेक जखमा ठेवून गेला आहे. हजारोंचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरात चिखलाचं साम्राज्य आहे. घरातील एक-एक वस्तू पाण्यात राहिल्यामुळे खराब झाली आहे. या पुरग्रस्तानांना सावरण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकं पुढे आले आहेत. मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे आणि औषधं याचा साठा पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवला जात आहे.
राज्यभरातून पूरग्रस्तांना मदतीचे हात
पुराचं पाणी ओसरू लागल्यामुळे कुठेतरी दिलासा असला तरी आता सगळ्यात मोठं संकट आहे ते रोगराई पसरण्याचं. या संकटातून बाहेर काढण्याची खूप मोठी जबाबदार सरकारवर आली आहे. अजून काही ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यातून लोकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांना लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यानेदेखील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत सलमानने खेद व्यक्त केला. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात बोलत होता. कोल्हापूरमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. तिथल्या मदपूरग्रस्तांना इंडियन एअरफोर्सच्या हेलिकाँप्टरमधून अन्न आणि पाणी वाटप करण्यात येत आहे.
रोगराईचं नवं वादळ
सांगलीमध्ये पुराची भीषण परिस्थिती पाहायला मिळाली. त्यात आता रोगराईचं वादळ समोर असताना त्याच्यावरही मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. सिव्हील हॉस्पिटल पूरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज करण्यात आलं आहे. त्यांना लागणाऱ्या सर्व औषधांचा साठा करण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये माणुसकीचं एक उत्तम उदाहरण समोर आलं. सांगलीमध्ये महापुरातून ज्यांनी प्राण वाचवले अशा जवानांचं औक्षण करून महिलांनी त्यांना राख्या बांधल्या.
बँक आणि एटीएम लवकर सुरू करा...
पूरग्रस्त भागातील बँक शाखा आणि एटीएम सुविधा लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुरामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यात आता पाणी ओरल्यामुळे पैशांची गरज आहे. अशा वेळी शहरातील एटीएम किंवा बँक शाखा नसल्यामुळे ते लवकरात लवकरत सुरू करण्यात याव अशी मागणी करण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours