बीड, 12 ऑगस्ट : माणुसकी जिवंत आहे का, असा प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. एचआयव्ही बाधिताचा मारणानंतरही वनवास सहन करावा लागला आहे. कारण मुलाच्या निधनानंतर आईने जीवाच्या आकांताने मदत मागूनही कुणीही पुढे आलं नाही. त्यामुळे एचआयव्ही बाधिताच्या मृतदेहाला अक्षरश: मुंग्या लागल्या.
अमोल (नाव बदलले आहे)या 12 वर्षीय मुलाचा एचआयव्ही आजाराने शनिवारी रात्री मृत्यू झाला. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत त्याला उचलण्यासाठी अथवा अंत्यसंस्कारासाठी कोणीच पुढे आले नाही. नात्यातल्या लोकांनीही दुर्लक्ष केलं. उशीर झाल्याने मृतदेहाला मुंगळे लागले होते.
मृत मुलाची आई एचआयव्हीग्रस्त असल्याने मुलालाही तोच आजार झाला. त्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. समाजाच्या हातापाया पडूनही कोणीच पुढे न आल्याने दु:ख डोक्यावर घेऊन आईने आपल्या मुलाचा मृतदेह रिक्षात घातला आणि थेट पाली येथील इन्फंड इंडियात आणला. या ठिकाणी अमोलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून समाजाचा अद्यापही एचआयव्ही बाधितांकडे पाहण्याचा दृष्टीकोण किती अज्ञानाने ग्रासले आहे, हे समोर आलं आहे.
अमोलची आई कविता (वय 42, नाव बदललेले) यांचा वयाच्या पंचविसाव्या वर्षी मुकादमासोबत विवाह झाला. सुरुवातीचे काही दिवस सुखाचा संसार झाल्यानंतर कविताला पतीने सोडले. त्यानंतर कविता घराबाहेर पडून हॉटेल आणि इतर ठिकाणी राहून काम करू लागली. यावेळी तिचे एका व्यक्तीशी संबंध आले. यातूनच ती गर्भवती राहिली. तिला अमोल आणि मोनिका (नाव बदलेली) अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना एचआयव्ही होता. साधारण दहा वर्षांपूर्वी मोनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मनिषा मनोजचा संभाळ करीत होती. मागील 15 दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खूपच खालावली. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी त्याला घरी नेले. रविवारी पहाटेच्या सुमारास अमोलची प्राणज्योत मालवली.
पोटच्या गोळ्याचा मृतदेह डोळ्यासमोर ठेवून कविता गल्लीतील लोकांना अंत्यसंस्कारासाठी विनवणी करीत होती. मात्र, समाजाने मदत करण्याऐवजी नावेच जास्त ठेवली. कोणीच पुढे येत नसल्याने कविता खचली होती. काय करावे समजत नव्हते. अखेर दु:ख पचवून कविताने रिक्षा केली आणि त्यात मृतदेह घेऊन थेट पाली येथील इन्फंट इंडिया गाठले. इन्फंटच्या ‘वेदना’ स्मशानभूमीत दुपारच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इन्फंटचे दत्ता बारगजे, संध्या बारगजे यांनी कविता यांना धीर दिला.
एचआयव्हीचा आजार झाल्याचे समजल्यावर कविता यांना त्यांच्या आईने घरापासून दूर केले. त्यानंतर भावाकडे गेल्यावर भाऊ सुद्धा भांडला. त्यामुळे बेघर होऊन कविता मजूरी करून उदरनिर्वाह भागवत होती. 'मला आजार असल्याने परिसरातील लोकांनी खूप त्रास दिला. मी त्या परिसरातून जावे म्हणून माझ्यावर घरावरही अनेकदा दगडफेक केली,' असं कविता यांनी सांगितलं आहे.
'मृतदेह घेऊन महिला आमच्याकडे येताच सर्व कारवाई करून दफनविधी करण्यात आला. आता या आईलाही आम्ही आधार देत आहोत. सध्या इन्फंटमध्ये 69 मुलं- मुली आणि 8 महिला आहेत. या सर्वांचा सांभाळ कुटुंबातील सदस्याप्रमाणे आम्ही करतो. समाजाने मानसिकता बदलून यांना आधार देण्याची गरज आहे,' असं इन्फंटचे संचालक दत्ता बारगजे यांनी सांगितलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours