अहमदनगर, 18 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून रोहित पवार कर्जतमध्ये विधानसभेसाठी मोर्चेबांधणी आणखी मजबूत करत असल्याची चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे कर्जत-जामखेड या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर भाजप नेते आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचं तगडं आव्हान आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात राम शिंदे यांना चितपट करण्यासाठी रोहित पवार यांच्याकडून नगरमध्ये अनेक कार्यक्रमांद्वारे मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
कशी असेल कर्जतमधील 'महादंगल'?
रोहित पवार यांच्या 'सृजन' मार्फत कर्जत-जामखेड परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची "महादंगल" आयोजित केली आहे. कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात रविवारी 18 ऑगस्ट आणि सोमवार 19 ऑगस्ट रोजी कुस्तीची ही महादंगल होणार आहे.
18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या महादंगलीचे उद्घाटन होणार आहे. 18 तारखेला कर्जत आणि जामखेड तालुक्यातील 14 आणि 17 वयोगटातच्या आतील मल्लांची दंगल होणार आहे. तर 19 तारखेला भारत विरुद्ध इराण अशा आंतरराष्ट्रीय मल्लांची महादंगल होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील नामांकित मल्लांचीही महादंगल होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours