ठाणे, 21 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं आहे. प्रवीण चौगुले असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट रात्री उशिरा ही घटना घडली आहे. प्रवीण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा जवळचा व्यक्ती असल्याची माहिती आहे. प्रवीणनं स्वतःला जाळून घेत आपलं आयुष्य संपवलं. 'राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावली. यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे दुखावलो असून मी आत्महत्या करणार आहे', असं प्रवीणने त्याच्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगितलं होतं. प्रवीणच्या आत्महत्येची माहिती कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी दाखल करण्यात आला. दरम्यान, प्रवीण आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ जवळपास शेकडो पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यानं ईडीविरोधात अपशब्ददेखील वापरले आहेत.
राज ठाकरेंना ईडीची नोटीस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल प्रकरणी नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरेंना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यामध्ये संताप पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून अशा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अशा प्रकाच्या नोटीस बजावण्यात आल्या असून काहींना हजर राहण्यास सांगण्यात आलंय. कलम 149 नुसार या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मनसेच्या अनेक नेत्यांनी आंदोलनाचे इशारे दिले होते. तर काहींनी खळ खट्याक आंदोलनाचाही इशारा दिला होता. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या नोटीस दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सामाजिक शांतता भंग झाली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल, असा इशाराही या कार्यकर्त्यांना देण्यात आलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours