मुंबई, 21 ऑगस्ट :  काँग्रेस राष्ट्रवादीतील आणखी काही दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांच्या नावांची चर्चा आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते पक्षात घेण्याच्या जोरदार हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीची हरकत असल्यानेच हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. याबाबत पुढील काही दिवसांत मोठ्या हालचाली होतील, अशी माहिती आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये दाखल  होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यात नुकतीच दूरध्वनीवरून पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
उदयनराजेंच्या मनात काय?
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला परत एकदा मोठा धक्का बसू शकतो. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन  भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. उदनराजेंनी भाजपप्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours