कोल्हापूर, 13 ऑगस्ट- पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने कहर केला असून महापूरामुळे हजारो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. सांगली आलेल्या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत 22 जणांचा बळी घेतला आहे तर एक अद्याप बेपत्ता आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थितीमुळे विस्कळीत झालेले मन यातून पूरगस्त व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 12 ते 24 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी केला होता. मात्र, या आदेशाबाबत चहुबाजुंनी टीका झाल्यामुळे अखेर हा जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.
मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा बकरी ईद सण, 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात साजरा होणारा स्वतंत्र दिवस व 24 ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडी सण आदी सणांचे औचित्य साधून आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सांगितले होते.
भय इथले संपत नाही.. पुन्हा सतर्कतेचा इशारा
महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्यात वेधशाळेनं पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातल्या घाट क्षेत्रामध्ये 13 आणि 14 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कुठे पाणी ओसरून पुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार सुरळीत सुरू करायचा आहे. त्यात आता हवामान खात्याच्या अंदाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
गेल्या 8 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं. त्यात सोमवारी मात्र पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. पण आज आणि उद्या पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढणार आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. तर कोकणातल्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14ला तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours