मुंबई, 10 ऑगस्ट : राज्य सरकारने आणखी एक अजब अध्यादेश काढला आहे. पूरग्रस्त नागरिकांना त्यांच्या बँक खात्यात मदत करावी, असा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे आधीच रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला असताना लोक पैसे काढण्यासाठी बँकांपर्यंत कसे पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोल्हापूर आणि सांगली परिसरात पुरानं थैमान घातलं आहे. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मदत मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. अशातच सरकारच्या नव्या आदेशामुळे पूरग्रस्तांचा संतापात भर पडणार आहे.
दुसरीकडे, या अध्यादेशाबाबत सरकारने सारवासारव केली आहे. आम्ही सगळी रक्कम खात्यात न देता काही रक्कम रोख स्वरूपात देणार आहोत, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे याबाबत सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे, हे प्रत्यक्ष मदतीनंतरच लक्षात येईल.
दरम्यान, पुराचं पाणी दोन दिवस घरात असेल तरच मिळणार मदत, असा अजब अध्यादेश राज्य सरकारने याआधी काढला होता. सरकारच्या या निर्णयानंतर पूरग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आणि निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली.
पुराच्या पाण्याने थैमान घातल्याने सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच सरकारने दोन दिवस परिसरात किंवा घरात पुराचं पाणी साचलेलं असल्यावरच 10 किलो गहू आणि तांदूळ देणार असल्याचा अध्यादेश काढल्याने पूरग्रस्तांमध्ये संताप निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा ऑनलाईन मदतीचा अध्यादेश काढल्याने सरकारविरोधात रोष निर्माण होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours