मुंबई- एकीकडे शेतकर्‍यांना 'ऐ तू गप्प बस' अशा धमक्या आणि दुसरीकडे पुरग्रस्त भागातील जनतेचा रोष दाबण्यासाठी भाजपाने जमावबंदीचा आदेश काढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा संतप्त सवाल करतानाच अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत तर दुसरीकडे सरकारने पुरग्रस्त भागात 12 ते 24 ऑगस्ट दरम्यान जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे. सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.
शेतकऱ्यांना अशी दमदाटी करा किंवा जमावबंदी आदेश काढा आम्ही घाबरणार नाही. उलट जनताच याचं उत्तर द्यायला तयार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
कोल्हापुरात घडू शकते अनुचित घटना?
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने कहर केला आहे. महापूरामुळे हजारो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. सांगली आलेल्या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत 22 जणांचा बळी घेतला आहे तर एक अद्याप बेपत्ता आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थितीमुळे विस्कळीत झालेले मन यातून पूरगस्त व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 12 ते 24 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी केल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.
आज (12 ऑगस्ट) मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा बकरी ईद सण, 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात साजरा होणारा स्वतंत्र दिवस व 24 ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडी सण आदी सणांचे औचित्य साधून आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours