पंढरपूर, 28 ऑगस्ट : सत्ताधारी भाजपच्या महा जनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी आणि पक्षाला लागेल्या गळतीमुळे चिंतेत पडलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून अख्खं राज्य पिंजून काढत आहे. या यात्रेचं नेतृत्व राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे करत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल चढवला जात आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी मंगळवारी (27 ऑगस्ट)पंढपुरात घेतलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. थेट निशाणा साधत कोल्हे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे म्हणाले होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर सत्तेला लाथ मारू. पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे ते बसले आहेत. यांच्या खिशातील राजीनामे भिजून गेलेत पण त्यांनी राजीनामे काही दिले नाहीत'.

पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
याच सभेदरम्यान राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगा भरतीवरून पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे. साम, दाम, दंड, भेद नीती वापरून भल्या-भल्यांना वर्षा बंगल्यावर जाण्याची वेळी आली. ज्यांचं राष्ट्रवादी पक्षाच्या सातबारा वर नाव होतं ते पक्ष सोडून जात आहेत', अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकलेल्या नेत्यांवरही केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours