पुणे, 26 सप्टेंबर : मुंबई, कोकणसह पावसाची संततधार वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात तब्बल 10 जण वाहून गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील 5 जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून इतर जणांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. NDRFची तीन पथकं यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत.
पुणे शहराला रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आंबील ओढा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे लोकांच्या घरात पाणीच पाणी शिरलं आहे. कात्रज, बिबवेवाडी , सहकारनगर, हनुमाननगर, दत्तवाडी, दांडेकर पूल कोल्हेवाडी, किरकीटवाडी, मांगडेवाडी भागातील घरांमध्ये गुडघ्याभर पाणी शिरलं आहे. .3 ते 4 जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक भागात विजपुरवठा बंद करण्यात आला आहे. कात्रज नवीन बोगद्यात पाणी साचल्याने वाहने अडकून पडली आहेत. एनडीआरएफच्या तुकड्या कात्रजमध्ये दाखल झाल्यात. दांडेकर पूल इथल्या ओढ्याशेजारील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ मदतीचं आवाहन केलं आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूरमधील मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं होतं. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची पुरती तारांबळ उडाली होती. उत्तर पुणे जिल्ह्यात पावसामुळे भाजीपाला आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आधीच पिकांना बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये सोयाबीन, कोबी, झेंडू तसेच केळी अशी पिके आहेत.
मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे नदीतून 90 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कऱ्हा नदीच्या पातळीत पहिल्यांदाच एवढी वाढ झाल्याने बारामतीमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours