मुंबई: काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. या यादीत कुणाची नावं असतील, कोण कुठून उभं राहणार हे जवळपास ठरलं आहे. शुक्रवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात उमेदवार ठरले होते. त्या वेळी ती यादी लीक झाल्याची चर्चा होती. आता शनिवारी  कॉंग्रेस राष्ट्रवादीची बैठकही झाली. त्यामुळे अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 50 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने तयार केली आहे. यामध्ये 7 विद्यमान आमदारांचं तिकिट कापलं आहे.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे साताऱ्याच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच मतदान होणार आहे. उदयनराजेंविरोधा तगडा उमेदवार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी आग्रही होते. त्यातूनच पृथ्वीराज चव्हाणांचं नाव आघाडीवर आलं. उदयनराजेंविरोधात काँग्रेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे त्यांना दक्षिण कराडमधून विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज बाबांचं नाव यादीत नसल्याचं हे कारण असू शकतं.
याशिवाय मुंबईत मालाडमधून निवडून आलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांचं तिकीट कापलं असल्याचं वृत्त आहे. अस्लम शेख शिवसेनेत जाणार, अशा बातम्या मध्यंतरी येत होत्या. अद्याप त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नसला, तरी पक्षाने त्यांना या वेळी तिकीट नाकारलं असल्याचं समजतं. पंढरपूरचे आमदार भरत भालके यांनाही उमेदवारी मिळाली नसल्याचं समजतं. राहुल बोंद्रे या चिखलीच्या आमदारांना तिकीट मिळणार नाही, तसंच अक्कलकोटमधून निवडून आलेले माजी मंत्री सीताराम म्हात्रे यांचंही तिकीट कापलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours