मुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक आमदारकीच्या राजीनामा दिला. पार्थ पवार यांना डावलून रोहित पवार यांना अधिक प्रमोट करणे तसेच राष्ट्रवादीत नेतृत्त्व कोणाचे यावरून मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज आहेत. त्यामुळे ते मुख्य निर्णय प्रक्रियेपासूनही दूर आहेत. त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबात मोठे वाद सुरू आहे, कौटुंबिक कलहामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला, अशा अनेक शक्यता वर्तवण्यात आल्या. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. एवढेच नाही तर नेमके गृहकलह, कौटुंबिक कलह कशाला म्हणतात. हे सांगताना भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाऊ भावाला गोळ्या घालतो त्याला गृहकलह म्हणतात', असा घणाघाती टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि त्यांचा भाऊ प्रवीण महाजन यांच्या प्रकरणावरून भाजपला टार्गेट केले आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...
'आमचा घरसंसार एक आहे. कुणी उगाच हे गृहकलहामुळे झाले असे म्हणत ओरडत आहे. भाऊ भावाला गोळ्या घालतो, त्याला गृहकलह म्हणतात. बाकी गृहकलह नसतो. असे असले तरीही आम्ही यातही कधी पडलो नाही. अजित पवार हे खूप भावनिक व्यक्ती आहे. ते भावनिक असताना केवळ शरद पवारांचेच ऐकतात. ते आजही येणार नाहीत. कुठे तरी हिमालयात निघून जातील, असेच मला वाटले होते', असे जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलतानी सांगितले.
बँकेत 11 ते 12 हजाराच्या ठेवी असताना 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात. कोठून आले 25 हजार कोटी? आज हीच बँक 225 कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. हा केवळ व्यक्तीद्वेषातून सुडनाट्याचे राजकारण करत बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अजित पवार हा बहुजनांचा मुख्यमंत्री होऊ शकेल, या ताकदीचा नेता असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले. आरोपपत्रात शरद पवार यांचे नाव नव्हते. तरीही ईडीच्या आरोपपत्रात त्यांचे नाव येते. त्यासाठी हायकोर्टात नाव घेतले जाते. डीओडब्ल्युने सरकारच्या वतीने कोर्टात अशी कोणतीही केसच होत नाही. शरद पवार सोलापूरमध्ये जे काही बोलले त्याच्यानंतर हे सुडनाट्य पेटवण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours