पुणे, 28 सप्टेंबर : 'तुमच्या आमच्यापैकी जो कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो, त्याने आपल्या कुटुंबावर आलेल्या अडचणीच्या प्रसंगी जी प्रतिक्रिया दिली असती तितकीच प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणजे आदरणीय अजित दादांनी आपल्या आमदारकीचा दिलेला राजीनामा,' असं म्हणत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जोरदार समर्थन केलं आहे.
अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पवार कुटुंबात गृहकलह असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र काल (शनिवारी) अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत या चर्चा फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता रोहित पवारांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
'आमचा नाद करणारेच बाद होतील'
'पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होऊ द्या, पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील. मी मागे पण सांगितलं आहे की अजिबात कशाची काळजी करू नका. आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील. असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया,' असं आवाहन कार्यकर्त्यांना करत रोहित पवारांनी टीकाकारांना इशाराही दिला आहे.
'माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा. सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असतं? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात,' असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours