मुंबई, 19 सप्टेंबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. कारण आज संध्याकाळी निवडणूक आयोग पत्रकार परिषद होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी सुरू झाली आहे. निवडणूक तारखांची घोषणा झाल्यानंतर तर आरोप-प्रत्यारोपांचा स्वर टिपेला पोहचणार आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन विधानसभेच्या तारखांची घोषणा करणार का, याकडे राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.
निवडणूक तारखांआधीच उमेदवारांची घोषणा
विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पडझड रोखून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत. बीडमध्ये आज शरद पवार यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र आता या जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार यांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसंच परळीमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.
कोणत्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने कुणाला दिली उमेदवारी?
परळी - धनंजय मुंडे
बीड- संदीप क्षीरसागर
माजलगाव - प्रकाश सोळके
गेवराई - विजयसिंह पंडित
केज - नमिता मुंदडा
शरद पवार यांनी निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केल्याने जिल्ह्यातील राजकारण मोठे चुरशीचे होणार आहे. राष्ट्रवादीच्या या खेळीला आता भाजप कसे उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours