सातारा, 19 सप्टेंबर : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनेक नाव चर्चेत आहेत. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे.
उदयनराजेंची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यापासूनच त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र आता श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांचंही नाव स्पर्धेत आलं आहे. सारंग पाटील पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देऊ शकतील, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत तयार होताना दिसत आहे. परंतु पक्षाकडून अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा  करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या सातारा दौऱ्यावेळी उदयनराजेंविरोधातील उमेदवारावर शिक्कामोर्तब करतील, अशी माहिती आहे.
राष्ट्रवादीकडून दिग्गजांची नावं चर्चेत
उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.
उदयनराजेंना पराभवाची भीती?
'खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,' या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours