मनमाड, 5 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळ पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षात अर्थात शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा करण्यात येत आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मोठी घोषणा केली आहे.
छगन भुजबळ गेल्या दोन दिवसांपासून येवला मतदारसंघात तळ ठोकून आहेत. यंदाच्या निवडणुकीत छगन भुजबळ आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदासंघातून लढतील, असं बोललं जात होतं. अशातच आता छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत मी येवला मतदारसंघातूनच लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. भुजबळांच्या या घोषणेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी मंगळवारी येवल्यात विविध विकासकामांची उद्घाटने केली. तर बुधवारी सायंकाळी त्यांनी मतदारसंघातील गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसैनिक आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 'कोण आला रे कोण आला' अशा घोषणा देत त्यांच्या खांद्यावर भगवी शाल टाकून त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी आहे की काय, अशी चर्चा रंगत आहे.
एकीकडे, नाशिकच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी भुजबळांच्या सेना प्रवेशाबाबत थेट उत्तर देण्याचे टाळले. तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसापासून येवला मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते भुजबळांनी लवकरात लवकर सेनेत प्रवेश करावा यासाठी घोषणाबाजी करत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ हे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours