मुंबई, 5 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवारांचं कौतुक केलं आहे. तसंच अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोलाही हाणला आहे. 'महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली', असं सांगत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. सोलापूरच्या महाजनादेश सभेत बोलताना अमित शहांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. 50 वर्षांत पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत.
- गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे.
- भाजपचे अध्यक्ष अमित शहा सध्या सोलापूर दौऱयावर आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. घराणेशाही, भ्रष्टाचार हा त्याच्ंया टीकेचा विषय होता. यावर ‘चौथ्या’ पवारांनी उत्तर दिले आहे. गरज पडली की साहेबांचा म्हणजे शरद पवारांचा सल्ला घ्यायचा. बारामतीत येऊन सोयीनुसार कौतुक करायचे आणि निवडणुकांच्या वेळी साहेबांनी काय केले असे विचारायचे? कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असे साहेबांचे राजकारण नाही असेही रोहित पवारांनी ठणकावले आहे.
- महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली.
- हे इतके झाल्यावर पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न विचारणारे म्हणजे डबल ढोलकीचे राजकारण असल्याचा तीर रोहित पवारांनी मारला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours