मुंबई, 13 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीआधी होत असलेल्या पडझडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. मात्र पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मैदानात उतरणार आहेत. शरद पवार हे संपूर्ण राज्याचा दौरा करणार असून निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेच्या माध्यामातून पुन्हा एकदा भाजपला सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपच्या या रणनीतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा राज्याचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या आठवड्याभरात शरद पवारांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन पलटवार?
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला चितपट करून लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. मात्र सतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत आहे. हीच चिंता दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांची अनेकदा चर्चा होते. पण आता पवारांना पुन्हा शह देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि काही नेते गळाला लावले आहेत. त्यामुळे पक्ष सोडलेल्या नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours