पुणे: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी (14 ऑक्टोबर) पुण्यात पहिलीच जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी आपल्या स्टाईलनं भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. पण मुख्यतः त्यांच्या निशाण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असल्याचं दिसलं. युतीच्या जागा वाटपावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, ''पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता. माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपची असं वागायची हिम्मत झाली नसती. मी जरी असतो तरीही यांची अशी वागण्याची हिम्मत झाली नसती'',असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला.
राज ठाकरे यांच्या भाषणातील अन्य मुद्दे  
1. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. 'महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला. मनसेचा उमेदवार (अजय शिंदे) या चंपाची चंपी करणार', अशा शब्दांत राज यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
मनसे उमेदवार करणार 'चंपा'ची चंपी - राज 
राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होताच सभेसाठी जमलेल्या नागरिकांनी मोठमोठ्या आवाजात चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस राज यांनी 'काय बोलत आहात? असा प्रश्न विचारातच जनतेमधून 'चंपा' असं उत्तर आलं. राज यांनीही 'चंपा' म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला हाणला.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours