नाशिक,25 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी युतीत आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा खुलासा करून सेनेच्या इशाऱ्यातून हवा काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. शिवसेना भाजपसोबत राहूनही मुख्यमंत्रिपद घेऊ शकते, आता ते शिवसेनेने ठरवायचे आहे, असेही भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. येवल्यातून छगन भुजबळ निवडून आले आहेत.
दरम्यान, निवडणुक निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. मात्र आभार मानतानाच भाजपलाही त्यांनी टोले लगावले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असंही त्यांनी सांगितलं. आधी सत्तेचं वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरलं त्याची फक्त आठवण करून देतो असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाही एका व्यक्ती किंवा पक्षाभोवती प्रचार केंद्रीत राहू नये. जनतेनं अत्यंत जागरूकपणे मतदान केलंय. त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवलाय. काही जण गृहीत धरून चालतात त्यांनाही जनतेनं योग्य तो संदेश दिलाय असा टोलाही त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला. सत्ता स्थापनेही मला घाई नाही असंही त्यांनी सांगितलंय. भाजपने जागावाटपावेळी अडचण आहे म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. गरज पडली तर अमित शहाही चर्चेला येतील असंही ते म्हणाले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours