बीड, 1 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना युतीमध्ये वेगानं इन्कमिंग सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. बीडच्या राजकारणात हाबाडा आणि जादूची कांडी हे शब्द परवलीचे असतात. प्रत्येक निवडणुकीत याची प्रचिती मतदारांना येत असते. विधानसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंनी जादूची कांडी फिरवत राष्ट्रवादीला जोरदार हाबाडा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये स्वत: ज्या नमिता मुंदडांची उमेदवारी घोषित केली त्यांनीच राष्ट्रवादीतून पळ काढत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत परळीतल्या गोपीनाथगडावर नमिता मुंदडांना भाजपमध्ये घेत राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर जोरदार हाबाडा दिला आहे. तर राष्ट्रवादीचं घड्याळ काढताना अक्षय मुंदडांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली आहे.

समर्पण, संघटन आणि सर्वेनुसार नमिता मुंदडांना प्रवेश दिल्याचं सांगत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. बोहल्यावरून नवरदेव पळून जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या रमेश  कराडांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली. पण ऐनवेळी रमेश कराडांनी निवडणूकीतून माघार घेत भाजपत डेरेदाखल झाल्यानं राष्ट्रवादीची मोठी फजिती झाली. आता पुन्हा पवारांनी घोषित केलेल्या उमेदवारानंच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात परवलीचा शब्द असलेल्या जादूच्या कांडीनं दिलेल्या हाबाड्यानं राष्ट्रवादीला युद्ध सुरु होण्याआधीच पुरतं घायाळ केलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours