मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीडपासून केला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात त्यांच्या प्रचारार्थ भाजपचे सर्वोच्च नेते बीडमध्ये अवतरले. त्यानिमित्ताने पंकजा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सभेच्या ठिकाणी पंकजा यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. अगदी अमित शहा यांचं भाषण सुरू असतानाही पंकजा समर्थक घोषणाबाजी करत होते. हमारी मुख्यमंत्री कैसी हो... पंकजा मुंडे जैसी हो! अशा घोषणा सुरू झाल्या आणि भाजपमधली मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच सुरू झाल्याचं जाणवलं.

पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवणारे महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधले नंबर दोनचे मंत्री ठरलेले चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा मुख्यमंत्री होणार का या प्रश्नाला बगल देत पक्षश्रेष्ठी ठरवतील असं म्हणाले होते. पुण्यात प्रचार मेळाव्यानंतर बोलताना चंद्रकांत दादा म्हणाले की, 'पुढचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही.' त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पक्षश्रेष्ठी ठरवतील तो मुख्यमंत्री असं सांगताना, दादा पाटील आपल्याला महत्त्वाकांक्षा नाही, असंही म्हणाले होते, तरीही दादांचं नाव चर्चेत असल्याचं कार्यकर्ते सांगतात.

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षं सरकारवर पूर्ण पकड मिळवत स्थान पक्कं केलं आहे, असं वाटत असतानाच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी त्यांचं नाव निश्चित नसल्याच्या बातम्या सुरू झाल्या. मीच पुढचा मुख्यमंत्री असं फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीआधीच सांगून टाकलं होतं. नंतरही युतीची बोलणी सुरू असताना त्यांनी आपणच पुन्हा मुख्यमंत्री असं ठासून सांगितलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours