अहमदनगर, 10 ऑक्टोबर : अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण नगरमधील राष्ट्रवादीतील महत्त्वाचं नाव आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कळमकर यांनी हाती शिवबंधन बांधलं.
अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप आणि कळमकर या दोन गटांमध्ये वाद सुरू होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या मेळाव्यात हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं. कळमकर यांना या कार्यक्रमानंतर धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर आता अखेर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अभिषेक कळमकर हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचं पक्षांतर हा राष्ट्रवादीला धक्का असल्याचं मानलं जात आहे.
संग्राम जगताप यांच्याही शिवसेना प्रवेशाची झाली होती चर्चा
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी झाली होती. मात्र नंतर जगताप यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. मी राष्ट्रवादीसोबत असून माझा शिवसेना प्रवेश या फक्त अफवा आहेत, असा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने अहमदनगरमधून जगताप यांना पुन्हा उमेदवारी दिली.
संग्राम जगताप आणि लोकसभा निवडणूक
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे मैदानात होते.
लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरची जागा खूपच गाजली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने लगेचच त्यांना उमेदवारीही दिली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवलं.
बहुचर्चित नगरची लोकसभेची जागा अखेर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तबल 2 लाख 81 हजार 474 मतांनी जिंकली. या लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभेच्या जागांमध्ये डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली. संग्राम जगताप हे नगर शहराचे आमदार असूनही या विधानसभा मतदारसंघात सुजय विखेंनी 53122 मतांनी आघाडी घेतली होती. याच कारणामुळे संग्राम जगताप हे बॅकफूटवर गेले.
Post A Comment:
0 comments so far,add yours