मुंबई, 26 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठी निराशा हाती आली आहे. दिल्लीची सत्ता असणाऱ्या आपला राज्यात केवळ 0.1 टक्के मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे राज्यात नोटाला 1.35 टक्के मिळाली आहेत. विधानसभेच्या 288 पैकी आपने 20 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण यावेळीच्या निकालाने आपला राज्यातील वाटचाल अधिक अडचणीची जाणार असल्याचे दिसत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विदर्भात सभा घेतली होती. केजरीवाल यांनी पक्षाच्या उमेदवार परोमिता गोस्वामी यांच्यासाठी सभा घेतली होती. पण त्यांना केवळ 3 हजार 596 मते मिळाली. याउटल ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार अबू फैजी यांनी चांगली कामगिरी केली. फैजी यांना 30 हजार मते मिळाली ही संख्या एकूण मतांच्या 17.05 टक्के इतकी आहे. फैजी यांच्या प्रचारासाठी दिल्लीतील काही नेते देखील आले होते. या मतदारसंघात फैजी यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान होते.
आपला मुंबई वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी फार प्रभाव पाडता आला नाही. दिल्लीत पक्षाने ज्या पद्धतीने काम केले आणि सत्ता मिळवली होती तशी तयारी राज्यात दिसली नाही. अर्थात पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला होता. आम्ही लोकांचा आवाज होऊन निवडणुकीत उतरलो होते. भविष्यात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही मैदानात उतरू असे पक्षाच्या प्रवक्त्या रुबेन मैसक्रिन्हास यांनी सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours