मुंबई: देशात बुधवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता 175 पर्यंत पोहोचला आहे. एकीकडे महाराष्ट्रात तब्बल 49 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका गल्फ देशांमध्ये गेलेल्या तब्बल 26,000 भारतीयांसाठी क्वारंटाइनची सोय करीत आहे.
गुरुवार (19 मार्च) ते 31 मार्च यादरम्यान UAE, कुवेत, कतार आणि ओमेन या देशातून हे भारतीय येणार आहेत. साधारण 23 विमाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर19 मार्च ते 31 मार्च या दरम्यान दाखल होतील. केंद्राने दिलेल्या नियमावलीनुसार या भारतीयांना पुढील 14 दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
यापूर्वी दुबईहून आलेल्या 15 भारतीय नागरिक कोरोना संसर्गित असल्याचे आढळून आले आहे. यासाठी पालिकेने पवई येथे एका ट्रेनिंग सेंटरच्या इमारतीत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याशिवाय मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात आयसोलेशनची सुविधा देण्यात आली आहे. पवई (Powai) येथील क्वारंटाइन भागात सध्या 100 खाटांची सोय आहे. यानंतर आणखी खाटा आणण्यात येतील.
14 दिवसांच्या क्वारंटाइननंतर नागरिक घरी जाऊ शकतात. मात्र काहींना घरातही पुढील 14 दिवसांचं क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. या सर्व नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करता येणार नाही. त्यांना खासगी वाहनांमधूनच आपल्या घरी जाता येणार आहे. लांब राहणाऱ्या नागरिकांना मात्र पुढील काही दिवस पवई किंवा सेव्हन हिल्स रुग्णालयात राहावे लागणार आहे.
नागरिकांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वच्छतेबाबत अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. गल्फ देशांमधून येणाऱ्यांना क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले.
Post A Comment:
0 comments so far,add yours