मुंबई: जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भाव लक्षात घेता देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे, सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीपासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र जनतेला जास्त संभ्रमावस्थेत ठेवले असल्याने जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जीवनावश्यक गोष्टींच्या बाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासनही जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला दिले आहे.

लॉकडाऊनबाबत काय म्हणाले पंतप्रधान?
देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519वर पोहोचला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केलं. या आधी गुरूवारी त्यांनी भाषण केलं होतं. त्यात त्यांनी देशवासियांना रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभर जनतेने कडकडीत बंद पाळला होता. तर 5 वाजता आपल्या गॅलरीत येत सगळ्यांनी थाळीनाद करत डॉक्टर्स आणि कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सगळ्यांचे आभारही मानले होते. रात्री 12 पासून सर्व देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली.

तुमचं घराबाहेर पडणं हे मृत्यूला आमंत्रित करणारं ठरेल. जगभरात हेच दिसून आलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नका असं तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी सांगतो आहे असंही ते म्हणाले. ज्या देशांनी अशा प्रकारचे उपाय योजले त्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

पंतप्रधान म्हणाले, 22 मार्चला देशवासियांनी जनता कर्फ्यूमध्ये आपलं योगदान दिलं. संकटाच्या या काळात सर्व एकत्र आले आणि जगाला दाखवून दिलं. मानवता आणि देशावर संकट आलं तर आम्ही सर्व भारतीय एकत्र येवून त्याचा सामना करतो हे जगाला दाखवून दिलं आहे. जगातल्या शक्तिशाली देशांनाही कोरोनाने गुडघे टेकायला लावलं आहे. या देशांजवळ सर्व साधनं असतानांही कोरोना वेगाने पसरत आहे.

कोरोनाशी लढायचं असेल तर सोशल डिस्टसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. घरात थांबणं हे फक्त रुग्णच नाही तर प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते.

असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही. सगळ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं.

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519वर पोहोचला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 107 तर केरळमध्ये 87 जणांचा समावेश आहे. सख्या वाढत असल्याने जवळपास सरर्वच राज्यांनी लॉकडाउन केलं असून अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनला गांभीर्यानं घ्या
नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात काळ ट्विटरवर जनतेला आवाहन केलं होतं. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours