पुणे,  25 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. देशभरासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळून आले. मात्र, आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 5 जणांनी कोरोनावर पूर्ण मात केली आहे. लवकरच या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. या सर्व रुग्णांवर विशेष निरीक्षणाखाली उपचार सुरू आहे. आज एकूण 5 रूग्ण हे ठणठणीत बरे झाले आहे. या पाचही रुग्णांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. त्यांची प्राथमिक चाचणी केली असता रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे लवकरच त्यांची रुग्णालयातून सुटका होणार आहे.

तसंच, महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त झाले आहे. या दाम्पत्याची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे. गेल्या 24 तासांत दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने या दाम्पत्याला डॉ. नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

गेल्या 14 दिवसांपासून त्या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. त्यांनंतर मंगळवारी करण्यात आलेली पहिली प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. संबंधित दाम्पत्यानंतर आणखी तिघांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. 9 मार्चला ही बातमी समोर आल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर आता या दाम्पत्याची कोरोनातून सुटका झाली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 100 च्यावर पोहोचली आहे. पुणे आणि मुंबई शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.  मुंबईत काल मंगळवारी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला . कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने 23 मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाचा हा तिसरा बळी आहे. सदरच्या रुग्णाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचाही त्रास होत होता. जेव्हा त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours