नवी मुंबई, 31 मार्च : देशात सध्या कोरोनाव्हायरसमुळे थैमान माजलं आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने हा आजार मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. असं असताना नवी मुंबईत डॉक्टरांकडून एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. परदेशातून आलेल्या मुलीच्या संपर्कात येवूनही घरी न राहता पनवेलच्या एका डॉक्टरांनी रुग्णालयात हजेरी लावली. इतकंच नाही तर अनेक लहान मुलांवर उपचार केले असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या घरातील सदस्यांनाच 14 दिवस होम क्वारंटाईन होणं गरजेचे आहे. पण यानंतरही डॉक्टरांनी नियम न पाळता रूग्णालयात येवून लहान मुलांवर उपचार केले. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पनवेल आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल महापालिकेने संपूर्ण रूग्णालय सिल केलं आहे. सर्व रुग्णांची आणि तपासणी करून गेलेल्या रुग्णांची चाचणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांचा संख्या दिवसागणिक वाढत चालला आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे 47 नवे रुग्ण समोर आले तर आज पुन्हा 5 नव्या रुग्णांना कोरोना झाला असल्याचं समोर आलं आहे.

एक रुग्ण मुंबईत, 2 पुण्यात आणि 2 बुलढाण्यात असे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 225 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours