डोंबिवली, 27 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकांनी एका ठिकाणी गर्दी करू नये म्हणून लॉकडाउन आणि संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, डोंबिवलीमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने तर कहर केला आहे.
डोंबिवलीत एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. हा तरुण डोंबिवली पूर्वे भागात राहत असून तो तुर्कस्तान फिरायला गेला होता. तो मुबंई परत आल्यावर त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं होतं. मात्र, तसं असून सुद्धा तो एका लग्नात आणि हळदी मध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, त्याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती मेसेंजरवर आपल्या मित्रांना दिली आणि आपण दाखल झालो आहोत याची माहिती सुद्धा दिली.
हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. आता हा तरुण जिथे गेला तिथे पालिकेकडून फवारणी आणि तेथील नागरिकांची तपासणी चालू आहे, असं एका नगरसेवकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितलं.
याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांने याला दुजोरा दिला आहे. मात्र, कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला.आधीही डोंबिवलीमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.
आता कल्याण-डोंबिवली कोरोनाग्रस्तांची संख्या 6 वर पोहोचली आहे. यातील 2 रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे, असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
रेल्वे प्रवास करणाऱ्या मायलेकांना कोरोनाचा संसर्ग
दरम्यान, मुंबई विमानतळावर आरोग्य विभागानं हातावर मारलेला होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून मुंबई-लखनऊ रेल्वे प्रवास करणाऱ्या मायलेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली असून, त्यांच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्याचं काम हाती घेतलं आहे.
हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील पिलभीतमध्ये घडला. महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर हे सर्व परदेशातून प्रवास करून आल्याचं आणि होम क्वारंटाइनचा शिक्का मिटवल्याचा प्रकार समोर आला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours