मुंबई, 15 एप्रिल: अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्सनंतर आता भारतातही कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 1 हजार 36 नवीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 439वर पोहोचली आहे. त्यापैकी 9 हजार 756 रुग्णांवर देशातील विविध राज्यांमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 1 हजार 306 रुग्णांनी कोरोना विरुद्ध यशस्वी लढा दिला असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांना पुढचे 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 377 लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील 178 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
मुंबईतील भाटिया रुग्णालयातील 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांमध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 684वर पोहोचली आहे. त्यामध्ये मुंबई आणि पुण्यातील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे.
जगभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वेगानं वाढत आहे. चीनमधील वुहान शहरापासून या व्हायरसचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली होती. आता जवळपास 180 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. या व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यूचा आकाडा अमेरिका आणि इटली देशांमधील आहे. अमेरिकेत 25 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारपर्यंत जगभरात 1,20,000 हून अधिक लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours