मुंबई, 7 एप्रिल : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकदा नागरिकांकडून लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याने मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
यानुसार सध्या ज्या भागात कोविड – 19 (Covid - 19) चे रुग्ण आढळून येतात अशा परिसराला कंटेनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या भागात आता भाजी विकण्यासही मनाई करण्यात आली आहे. लोक भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे. या भागातून नागरिकांना घराबाहेर पडण्यास आणि बाहेरील नागरिकांना आत येण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. सध्या मुंबईत 241 कंटेनमेंट झोन आहेत.
आज मुंबईत नवे 100 रुग्ण आढळून आले असून यातील 55 जण प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. त्यानुसार आतापर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 590 वर पोहोचली आहे. याशिवाय आज एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. तर आज 221 संशयितांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रामाणिकपणे लॉकडाऊनचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours