यवतमाळ : कोरोनाच्या संकटाने देशभरात लॉकडाऊन होताच अनेक मजुरांची तारांबळ उडाली. घरापासून दूर अडकलेल्या मजुरांनी घरी पोहोचण्यासाठी वाट्टेल ती जोखीम पत्करली. यवतमाळमधील दोन मजुरांची अशीच चित्तरकथा समोर आली आहे. 700 किलोमीटरचा खडतर प्रवास करत गुजरातमधून दोन तरुण यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. तर जंगलातल्या मंदिरात थांबावे लागले. तसेच आता पुढचे 14 दिवस गावच्या शाळेत क्वॉरंटाईन होऊन राहावे लागणार आहे.
दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात हा प्रकार घडला आहे. सुरेश रामपुरे आणि विशाल मडावी अशी या तरुणांची नावे आहेत. दोघेही रोजगारासाठी गुजरातमध्ये गेले होते. सुरत जिल्ह्यातील नवागाव दिंडोली येथील एका रसवंतीमध्ये काम करायचे. मात्र कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली आणि रसवंतीचा रोजगार थांबला. आता रोजगारही नाही अन् आश्रयही नाही, म्हणून या दोघांनीही गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. परंतु गावाकडे येणार कसे सगळीकडे वाहतूक बंद.
राज्याच्या आणि जिल्ह्याच्याही सीमा ओलांडण्यावर बंदी. शेवटी त्यांनी गुजरात ते दारव्हा खडतर प्रवास पायीच करण्याचे ठरविले आणि 31 मार्चच्या रात्री तिथून निघाले. नवागाव दिंडोळी ते कोरदोडा हे 70 किलोमीटरचे अंतर पायी चालत आल्यावर त्यांना गुजरात पोलिसांनी पकडले.
धाकदपटशा करीत पोलीस वाहनातून उचलगावपर्यंत आणून सोडले. हे गाव गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे. इथून पुढे रस्त्याने गेले तर पोलीस पुन्हा अडवतील म्हणून हे दोन्ही तरुण चक्क शेत, जंगल अशा मागार्ने वाटचाल करू लागले.
मजल दरमजल प्रवास करीत ते नंदूरबारपर्यंत पोहोचले. तिथे एक टेम्पो मिळाला. त्यातून ते जळगावात आले. पुन्हा दुसरे वाहन पकडून धुळ्यात आले. मग पायी चालत मूर्तिजापूर-बडनेरा-नेर असा प्रवास करीत आले. अन् शेवटी 4 एप्रिलच्या मध्यरात्री ते दारव्हा तालुक्यातील चिकणी या आपल्या मूळगावात दाखल झाले.
इथे येण्यापूर्वी त्यांनी नातेवाईकांना फोन केला. मात्र नातेवाईकांनी कोरोनाची परिस्थिती पाहून नातेवाईक आणि गावकऱ्यांनी ताठर भूमिका घेत त्यांना गावाबाहेरच थांबविले. रात्रभर गावाबाहेरच्या हनुमान मंदिरात थांबवून सकाळीच दारव्हा येथे उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने गावात परत आणले गेले.मात्र अजूनही दक्षता म्हणून 14 दिवस त्यांना घराऐवजी गावातील शाळेत ठेवले आहे. तलाठी, पोलीस पाटील आदींच्या हजेरीत त्यांची व्यवस्था करण्यात आली.
Post A Comment:
0 comments so far,add yours