मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. येत्या 3 मे पर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर आहेत. यामध्ये पोलीस तर तासंतास रस्त्यावर लोकांच्या सुरक्षेसाठी ठाण मांडून आहेत. लोकांनी बाहेर पडू यासाठी पोलीस रस्त्यावर उभे आहेत. यावेळी पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. या पोलीस कर्मचाऱ्यांना छोटीशी मदत म्हणून बॉलिवूड स्टार्ससाठी असणाऱ्या व्हॅनिटी वॅन खुल्या करण्यात आल्या आहेत.
या व्हॅनिटी व्हॅनमध्ये 3-3 रुम आहेत. यामध्ये शौचालय, झोपण्याची सोय आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात महिला पोलीस कर्मचाऱ्यांना व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. जेवण करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी आणि शौचालयासाठी या पोलिसांना व्हॅनिटी व्हॅनचा वापर होत आहे. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.तसेच एसीचीही सोय या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहेत. याआधी आम्हाला शौचालयासाठी लांब असलेल्या पोलीस चौकीत जावं लागत होतं. मात्र व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध झाल्याने आमच्या अनेक समस्या सुटल्या आहेत, आम्हाला याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया महिला पोलिसांनी दिली आहे.
केतन रावल यांनी या व्हॅनिटी व्हॅन पोलिसांसाठी खुल्या केल्या आहेत. केतन रावल हे स्वत: 45 व्हॅनिटी व्हॅनचे मालक आहेत. देशभरात सेलिब्रिटींसाठी ते व्हॅनिटी व्हॅन पुरवतात. लॉकडाऊनमुळे त्यांचं रोज 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत नुकसान होत आहे. मात्र एकीकडे आपलं एवढं नुकसान होत असताना त्याची चिंता करत न बसता त्यांनी आपल्या खऱ्या हिरोंना अर्थात पोलिसांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
एबीपी न्यूजशी बोलताना केतन रावल यांनी म्हटलं की, माझ्यावतीने मी देशासाठी आणि पोलिसांसाठी काही करु इच्छितो. त्यामुळे नाकाबंदीदरम्यान उन्हात तासंतास रस्त्यावर उभ्या असणाऱ्या पोलिसांसाठी मी माझ्या व्हॅनिटी व्हॅन पुरवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात आतापर्यंत 13 व्हॅनिटी वॅन उपलब्ध केल्या आहेत आणि उद्या आणखी 5-6 व्हॅनिटी व्हॅन मी पाठवणार असल्याचं रावल यांनी सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours