पुणे 10 एप्रिल : कोरोनामुळे सगळ्यांमध्येच प्रचंड भीती निर्माण झाली. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास नेमके काय करायचं याचे नियम घालून दिलेले आहेत. मात्र साधनांची कमरता असल्याने त्याचा फटका बसतो आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काराला जाताना सुरक्षेसाठी असलेला PPE सूट नसल्याने एका रुग्णाचा मृतदेह 3 तास येरवड्याच्या स्मशानभूमीत गाडीतच होता. PPE सूट नसल्यामुळे मृतदेह कुणी उचलायचा असा प्रश्न ॲम्बुलंसच्या चालकाला पडला. तर मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांकडेही सुरक्षेची साधन नसल्याने तेही हतबल होते. त्यामुळे मृत्यूनंतरही त्या रुग्णांचे हाल थांबेनात अशीच चर्चा आहे.
अंत्यसंस्कार कुठे करायचे हे नक्की नसल्याने मृतदेह आधी येरवडा स्मशानभूमीत नेण्यात आला. तिथे किट नसल्याने कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवीली. नंतर मृतदेह पुन्हा मुंढवा सम्शानभूमीत नेण्यात आल्यानंतर तिथे विद्युतदाहिनी बंद असल्याच लक्षात आलं. त्यानंतर पुन्हा येरवडा स्मशानभूमित मृतदेह नेण्यात आला. मात्र सुरक्षा सूट नसल्याने तीन तासापासून गाडी तशीच उभी होती. शेवटी रात्री उशीरा महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी किट घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
पुणे मनपाकडे फक्त 150 PPE सूट शिल्लक असल्याची माहिती आहे. ते पुरवून वापरण्याच्या राज्य शासनाच्या सूचना आहेत. कमतरता असल्याने 4 तासाच्या वापराचे किट नायडू रूग्णालयात 6 तासांसाठी वापरले जाता आहेत. पुणे महापालिकेच्या उपचार केंद्रावरही या सूटची गरज आहे. राज्य शासनाने तातडीने यात लक्ष घालावं अशी मागणी केली जात आहे.
राज्यात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळले आहेत. याच दोन्ही महापालिका आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक मृत्यूही झाले आहेत. पण कोरोनाबाधितांची संख्या विचारात घेतली, तर Coronavirus चं सर्वात उग्र रूप सध्या पुण्यात दिसत आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर खूपच जास्त आहे. 9 एप्रिलला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात आतापर्यंत 181 कोरोनारुग्ण सापडले आहेत आणि या शहरात 24 बळी गेले आहेत. याचा अर्थ पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर 13 टक्क्यांच्या पुढे आहे. कोरोनाचं सर्वात भीषण रूप पाहिलेल्या इटलीहूनही हा मृत्यूदर जास्त आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours