पुणे, 10 मे : लॉकडाऊनमधील कालावधीत राज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्याबाबत 9 मे रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेशानुसार देण्यात येणारी मोफत बस प्रवासाची सुविधा केवळ दोन परिस्थितीतच लागू राहील, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.
इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले असतील त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर व इतर व्यक्ती जे इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेले आहेत, त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यापर्यंत पोहचविण्याकरताच मोफत बससेवा देण्यात येणार आहे.
याशिवाय कोणत्याही इतर प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इतर नागरिकांना आपल्या खिशातून पैसे मोजून इच्छित स्थळी जावं लागणार आहे.
'पुण्यातील विद्यार्थ्यांची गावी परतण्यासाठी मोफत व्यवस्था करा'
पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणारे सुमारे चार हजार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकलेले असून अनेक विद्यार्थ्यांकडे पैसे शिल्लक राहिलेले नाही. राज्य शासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना गावी पाठविण्याची मोफत व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांनी शनिवारी केली.
माधव भांडारी म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे किमान 3 ते 4 हजार विद्यार्थी पुणे शहरात अडकून पडलेले आहेत. मेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाची मोठी अडचण झालेली आहे. काही सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांना जेवण देण्याची व्यवस्था आतापर्यंत सुरु आहे, मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत.'
'राज्य सरकारने या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष व्यवस्था करण्याची गरज होती ती आतापर्यंत शासनाने केलेली नाही. संस्थांनी केलेली जेवणाची सोय आता अपुरी पडू लागली आहे. जवळचे पैसे संपत आल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. कुटुंबियांकडून गावी परत कधी येणार अशी वारंवार विचारणा होत असल्याने ते अस्वस्थ होत आहेत. अनेक दिवसांपासून परत जाण्यासाठी व्यवस्था होण्याची मागणी सुरु असून देखील शासन काहीच हालचाल करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमधील नाराजी वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परिवहन महामंडळाच्या बसेसने गावी पाठविण्याची व्यवस्था शासनाने करण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांकडील पैसे संपत आल्याने त्यांच्यासाठी गावी जाण्याची व्यवस्था शासनाने मोफत करावी,' अशी मागणी माधव भांडारी यांनी केली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours