जालना, 23 मे : मालेगावसारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भागात कर्तव्य बजावून घरी परतलेल्या जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या एका फौजदाराचं घरी अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. पत्नी व नातेवाईकांनी या फौजदारावर पुष्पवृष्टीने तर वृद्ध आईने पारंपरिक पद्धतीने दृष्ट काढत स्वागत केलं. तर या कोरोना योद्धा फौजदाराने देखील कडक सॅल्युट मारून या सत्काराची परतफेड केली.
दत्तात्रय खांडेकर असं या फौजदाराचं नाव असून ते राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 3 येथे पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराने जगभरात थैमान घातलं असून सर्व सामान्य जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. पण अशा बिकट परिस्थितीत देखील पोलीस बांधव मात्र स्वतःचे कुटुंब वाऱ्यावर सोडून आपल्या जीवाची परवा न करता 'ऑन ड्युटी 24 तास' राबत आहेत.
दत्तात्रय खांडेकर आपल्या कंपनीसोबत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोरोना बंदोबस्तावर गेले होते. मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढला की, तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उप निरीक्षक खांडेकर यांच्या अनेक सहकारी पोलीस जवानांना कोरोनाने ग्रासले. परंतु, न डगमगता खांडेकर यांनी मालेगावमध्ये आपला कर्तव्य काळ पूर्ण केला.
यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून खांडेकर यांच्यासह इतर 67 जवानांना भोकरदन येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं होतं. खाडेकर यांनी 20 दिवसांचा क्वारंटाइन काळ पूर्ण केला. त्यानंतर घेण्यात आलेल्या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे क्वारंटाइन सेंटरमधून त्या घरी जाण्यास परवानगी देण्यात आली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours