पुणे, 23 मे : पुण्यात काही दिवसांपूर्वी एका कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.
शोएब मजीद शेख (वय 27) असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरात शोएबवर अनेक गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर मारहाण, धमकावणे असे गुन्हे दाखल आहे. शोएब हा एक सरकार राज नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवत होता. या ग्रुपचा तो अॅडमिनसुद्धा होता.
शोएब ज्या परिसरात राहतो, त्याच परिसरातील राहणाऱ्या आरोपींसोबत त्याचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून शोएब याने त्याला मारहाणही केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपीने शोएबचा काटा काढण्याचं ठरवलं.
शुक्रवारी मध्यरात्री शोएब हा भेकराईनगरमध्ये आला होता. तेव्हा दबा धरून बसलेल्या तिघांनी त्याच्यावर कोयत्याने भीषण हल्ला केला. भररस्त्यावर कोयत्याने सपासप वार करून शोएबचा निर्घृण खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शोएबने काही वेळात जीव सोडला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शोएबचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. लॉकडाउनच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली. पोलिसांनी रात्री शोधमोहिम करून तिन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं.
या तिन्ही आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
कुख्यात गुंड महाकालीच्या भावाची हत्या
दरम्यान, 17 मे रोजी पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड महाकालीच्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. वाकड परिसरातील पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली ही घटना घडली होती. कुख्यात गुंड महाकाली उर्फ राकेश ढकोलिया याचा 2010 मध्ये एन्काउंटर करण्यात आला होता. त्यानंतर महाकाली टोळी मार्फत अनेक बेकायदेशीर कामं करणाऱ्या महाकालीचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ढकोलिया या घटनेत जागीच ठार झाला होता.
Post A Comment:
0 comments so far,add yours