मुंबई, 23 मे: 'कामगार आघाडी'चे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दादा सामंत यांनी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ते 92 वर्षांचे होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे,  प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे थोरले बंधू तर कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका होत.
दादा सामंत यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. दादा सामंत यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते. मात्र, पोलिसांकडून रात्री या आत्महत्येच्या वृत्तास दुजोरा मिळाला नव्हता. या प्रकरणी दहिसर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दादा सामंत यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी, तीन विवाहित कन्या गीता, नीता आणि रुता, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
दादा सामंत यांचा जन्म 1930 मध्ये झाला. ते मुंबईतील कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक होते. 1981 मध्ये मुंबईत झालेल्या गिरणी संपानंतर दादा सामंत यांनी ग्वाल्हेर येथील मिलमधील नोकरी सोडून दत्ता सामंत यांच्यासोबत युनियनमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. डॉ. दत्ता सामंत यांची जानेवारी 1997 मध्ये हत्या झाली. त्या हत्येनंतर 18 जानेवारी 1997 ते 9 मे 2011 पर्यंत दादा सामंत यांनी कामगार आघाडी आणि संलग्न युनियनचे अध्यक्षपद सांभाळले.
दत्ता सामंत यांच्यानंतर दादांनी कामगार चळवळ पुन्हा एकदा नव्याने उभी केली, अशा शब्दांत 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस'चे राज्य सचिव राजू दिसले यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours