भाजपचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन नाना पटोले यांनी गोंदीया हा लोकसभा मतदारसंघ रिक्त केला आहे. तरीही या ठिकाणी पोटनिवडणूक होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकांत भाजपला धक्का बसल्याने गोंदिया आणि पालघर या दोन लोकसभा मतदारसंघाकडे आता लक्ष लागले आहे.

लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये सातत्याने भाजपला पराभव पत्करावा लागत असल्याने राज्यातील दोन लोकसभा पोटनिवडणुका जाहीर करण्यात उशिर होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा गेल्या 7 डिसेंबरला दिला आहे. पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक होऊ घातली आहे. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतरही पोटनिवडणूक झाली नाही.उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य या दोन्ही नेत्यांचे लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामा व पटोले यांचा राजीनामा एकाच दिवशी लोकसभा अध्यक्षांनी मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक 11 मार्चलाझाली परंतु भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. ``पोटनिवडणुकांच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असते. सध्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपबद्दल नाराजी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोटनिवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपचा पराभव झाला. राज्यातही भाजपचा पराभव होऊ शकेल, या भीतीने मुख्यमंत्री फडणवीस पोटनिवडणुकांना विलंब करीत आहेत.``भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवणार काय, यावर ते म्हणाले, कोणता पक्ष निवडणूक लढतो, हे महत्त्वाचे नाही. निवडणुका तर जाहीर होऊ द्या? कोण निवडणूक लढणार हे लोकांना कळणारच आहे. कॉंग्रेस लढणार की राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढणार, याची चिंता भाजपने करू नये. त्यांनी आपला उमेदवार निश्चित करावा, असा सल्लाही पटोले यांनी दिला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours