10 मे : शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कापूस आणि धान शेतक-यांना सुमारे 3 हजार 400 कोटींची मदत मिळणार आहे. गेल्या खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोग प्रभावीत पिकांच्या शेतक-यांना अखेर राज्य शासनानं मदत देण्याबाबातचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
यानुसार ३ हजार ४८४ कोटी रुपये रक्कम शेतक-यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. 3 समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. कापसाला बोंड अळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
त्यातच विषारी किटक नाशक फवारणीमुळे सुमारे ३० पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुर यांचा मृत्यु झाला होता. तर धान पिकाला तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठा फटका विदर्भातील शेतक-यांना बसला होता.
तात्काळ नुकसान भरपाई जाहिर केली जात नसल्याबद्दल तसंच केंद्राकडून मदत न आल्याबद्द्ल हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या मोठ्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली होती.
कापूस किंवा धानाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक-यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. असं असलं तरी आता पुढचा खरीप हंगाम तोंडावर आला असतांना गेल्या खरीप हंगामातील नुकसानाची भरपाई देण्याचा शासन निर्णय अखेर मंगळवारी काढण्यात आला आहे. म्हणजेच आता कुठे या नुकसान भरपाईला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours