10 मे : पालघर लोकसभा पोटनिवडणूकित चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे राजेंद्र गावित, काँग्रेसचे दामू शिंगडा, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात ही लढाई होणार आहे.
काँगेसकडून तब्बल पाच वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या दामू शिंगडा यांना उमेदवारी निश्चित झाली आहे तर शिवसेनेनं दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असणार आहेत. 2009 साली पालघरचे खासदार म्हणून निवडून आलेले आणि 2014 मध्ये पराभव पत्करावा लागलेले माजी खासदार बळीराम जाधव यांना बहुजन विकास आघाडी आपल्या सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरवत आहेत.
दरम्यान दामू शिंगडा आज सकाळी ११.४५ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजापाकडून राजेंद्र गावित सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करणार आहेत.
पण चौरंगी लढत होणार असली तरी भाजपचे राजेंद्र गावित आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांच्यातील लढत ही चुरशीची आणी रंगतदार होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाचे उमेदवार हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले आहेत.
अनेकवेळा 'स्वबळावर' ची भाषा करणाऱ्या शिवसेनेसाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या आकस्मित झालेल्या मृत्यूमुळे ही पोट निवडणूक होत आहे. यासाठी येत्या 28 तारखेला मतदान होणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours