मुंबई,ता.31 मे: पालघरमधल्या पराभवनानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र सरकारमधून बाहेर पडणार का? या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी बगल दिली. तुमच्या प्रश्नांना उत्तर दयायला मी आलो नाही. लोकशाही धोक्यात आहे तो प्रश्न गंभीर आहे आणि ते गांभीर्य तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली.
पालघर मधला पराभव हा शिवसेनेचा खरा पराभव नसून लोकांच्या मनात शिवसेना आहे. सर्व विरोधीपक्षांच्या मतांची बेरीज केली तर ती भाजपपेक्षा जास्त होते. निवडणूक आयोगाचं काम हे अतिशय पक्षपाती असून पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्याला तातडीनं निलंबित करा अशी मागणीही त्यांनी केली.
या पुढे सर्व निवडणूका स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा शिवसेनेने या आधीच केली आहे. तिच भूमिका कायम राहिल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. साम दाम दंड भेद भूमिकेचा पालघरमध्ये विजय झाला असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून शिवसेना सातत्यानं सरकारमधून बाहेर पडण्याच्या धमक्या देत आहे.
आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो असतं म्हणत शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं पालघरच्या पराभवानंतर हे राजीनामे खिशातून बाहेर निघणार का अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारला धोका नाही हे स्पष्ट झालं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours