पालघर, 26 मे : पालघर लोकसभा पोट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रानशेत गावात भाजपचे १२ कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असताना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले होतं. मतदारांना पैशांचं वाटप करणाऱ्या १२ कार्यकर्त्यांच्या विरोधात सबळ पुरावा असतानाही डहाणु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असा आरोप शिवसेनेनं केला.
याविरोधात शिवसैनिकांनी डहाणु पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलं. निवडणुक आयोग आणि पोलीस यांचा पंचनामा पूर्ण होऊनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी डहाणु पोलिस स्टेशनमध्ये रात्रभर डोक्यावर घेतलं.
पण दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ पालघरमध्येच नव्हे तर पालघरच्या सीमेपासून ५ किमीच्या परिघातील सर्व बार, वाईन शॉप्स आणि बिअर शॉपी बंद राहतील. २६ मेच्या संध्याकाळपासून २८ मे पर्यंत तर ३१ मे या निकालाच्या दिवशीही हा ड्राय डे लागू राहील, असा ठाणे जिल्हाधिका-यांचा आदेश मुंबई हायकोर्टानं कायम ठेवला आहे.
जिल्हाधिका-यांच्या या आदेशाला ठाण्यातील बार मालक संघटनेच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. आमचा पालघर जिल्ह्याशी काहीही संबंध नाही, मग आमच्या व्यवसायावर टाच का असा सवाल या याचिकेत करण्यात आला होता. मात्र याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय.
ही दारूबंदी नियमानुसारच असल्याचं यावेळी सरकारी वकिलांच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
Post A Comment:
0 comments so far,add yours