रिपोर्टर:हर्षीता ठवकर
चुल्हाड (सिहोरा) : मंडप पूजन कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी जाणाऱ्या तीन इसमांवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास महालगाव शिवारात घडली. नंदराम बघेले (७०), लक्ष्मण कटरे (४०) आणि जियालाल बघेले (६५) रा. बिनाखी अस्शी जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
वारपिंडकेपार येथील ललीत पटले यांच्या घरी विवाह समारंभाचे आयोजन होते. यानिमित्त नंदराम बघेले, लक्ष्मण कटरे आणि जियालाल बघेले हे तिघेही एकाच दुचाकीने रात्री ९ वाजताच्या सुमारास घरून निघाले. या तिघांनी बिनाखी ते महालगाव मार्गाने जाण्याचा बेत आखला. या मार्गाने गेल्यास वारपिंडकेपार गावचे अंतर कमी आहे. या मार्गाने जात असताना महालगाव गावाच्या हद्दीत या तिघांना अज्ञात आरोपींनी अडविले. लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी पैशाची मागणी करीत त्यांच्याकडील साहित्य तपासले. परंतु या तिघांकडे पैसे नव्हते. वाद्यवृंद साहित्याची तोडफोड केली. हल्लेखोरांचा संवाद हिंदी भाषेत होता. मारहणीनंतर जखमींना त्यांनी जाण्यास सांगितले. जखमी अवस्थेत ते वारपिंडकेपार गावाकडे न जाता त्यांनी थेट बिनाखी गाव गाठले. गावकऱ्यांना त्यांनी घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी पुन्हा घटनास्थळा गाठले. परंतू हल्लेखोरांचा सुगावा लागला नाही. या घटनेत लक्ष्मण कटरे यांचे डोक्याला जखम झाली आहे. तर अन्य नंदराम आणि जियालाल यांच्या पायाला दुखापत झाली आहे. अंधार असल्याने हल्लेखोरांची ओळख पटली नाही. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सिहोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भादंविच्या ३४१, ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours