नागपूर, 14 जुलै : अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे 4 हजार 800 पोलीस नागपूर शहरात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांची भेट घेवून त्यांच्यासमवेत मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांसमवेत रांगेत उभे राहून स्वत: जेवण घेतलं. तसेच पोलिसांसमवेत पंगतीत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रत्येकाच्या जवळ जावून मुख्यमंत्री त्यांची राहण्याची, जेवण्याची, वैद्यकीय सुविधांची माहिती घेत होते. स्वत: मुख्यमंत्र्यांकडुन झालेल्या या आस्थेवाईक चौकशीने पोलिसही भारावून गेले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या प्रशिक्षण केंद्रातील निवासी पोलिसांचीही भेट घेतली. राज्याच्या विविध भागातून राज्य पोलिस दल, महामार्ग सुरक्षा पथक, मुंबई रेल्वे या विविध दलाचे सुमारे 4 हजार 800 पोलिस सध्या नागपूरात अधिवेशन कर्तव्यावर तैनात आहेत.

पोलिस आयुक्तालयामार्फंत शहरातील 56 ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलिसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य तपासणीसाठी 10 वैद्यकीय पथके तैनात असून पॉलिक्लिनिक मार्फंतही पोलिसांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला पोलिसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours